तीर्थपुरी : मुरमा (ता.घनसावंगी) येथील पंढरीनाथ मगनराव यादव या शेतमजुराच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेची तयारी केली. शिकवणी, क्लास न लावता स्वअध्ययनाच्या बळावर पंढरीनाथ आता राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेत यशस्वी झाला आहे.
मगनराव यादव यांच्या कुटुंबात अठराविश्व दारिद्य्र असल्याने या कुटुंबातील प्रत्येकाला मजुरी केल्याशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नाही. मगनराव यांना दोन एकर जमीन असून, संपूर्ण आयुष्य इतर ठिकाणी मजुरी करण्यात घातले. मगनराव यादव यांना एकूण तीन मुले आहेत. दोघे ऊसतोडणी करत असून, सर्वांत लहान असलेल्या पंढरीनाथला पूर्वीपासून शिक्षणाची आवड होती. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत तर सहावी ते दहावीपर्यंत शिक्षण घरच्या शेळ्या चारत तीर्थपुरी येथील जिल्हा परिषद प्रशालेत पूर्ण केले. दहावी पास होऊनही पैसे नसल्याने अकरावीला प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे तीर्थपुरी येथील एका कृषी सेवा केंद्रात काम करून त्यानंतरच्या काळात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती बिकट असल्याने पुढील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी एका खासगी कंपनीत काम करून पदवीपर्यंतचे शिक्षण तीर्थपुरी येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयात पूर्ण केले. परिस्थिती गरिबीची व कुटुंबात शिक्षणाचा अंधार असल्याने स्वत:चा निर्णय स्वत:लाच घ्यावा लागत होता.
शिक्षणाची आवड व ध्येय समोर ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पैसे व वशिला लागत नसल्याने नोकरी मिळू शकते ही आशा बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या संपूर्ण शिक्षणाच्या काळात मावस भाऊ आ. आर. कदम यांचे मोठे आर्थिक व मानसिक पाठबळ लाभले. स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने शिवकणी वर्ग लावता आले नाही. त्यासाठी अभ्यासाचे नियोजन केले. 2013-2014 या वर्षात तलाठी व वरिष्ठ लिपिक या पदांसाठी परीक्षा दिल्या. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊन, वरिष्ठ लिपिक या पदावर औरंगाबाद येथील जायकवाडी पाटबंधारे विभागात रुजू झाले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करण्यास वेळ मिळू लागला. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पंढरीनाथला यश मिळविता आले. लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश आल्याने कुटुंबासह गावात मोठा आनंद झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी गावातून पंढरीनाथ यादव यांची मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.
अभिनंदनाचा वर्षाव
पंढरीनाथ यादव याने विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्याचे उत्तमराव पवार, श्याम मुकणे, सुदामराव मुकणे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, प्राचार्य भुजंग डावकर, शिवराज लाखे यांच्यासह प्राध्यापकांनी अभिनंदन केले.
आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही ध्येयाची एकएक पायरी चढत गेलो. मनाची तयारी करत ध्येय समोर ठेवत नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते.
- पंढरीनाथ यादव



