Wednesday, 1 March 2023

परीक्षेदरम्यान ताणतणावाचं व्यवस्थापन करताना.....

परीक्षेदरम्यान ताणतणावाचं व्यवस्थापन करताना.....
विद्यार्थी मित्रांनो, दहावीची परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कधी एकदा परीक्षेला सुरुवात होईल आणि मी पेपर कसा लवकर सोडवणार असे विद्यार्थ्यांना झाले असेल. तर काहींना तणाव जाणवत असेल.हे सर्व नैसर्गिकच. फक्त याला आपण सामोरे कसे जातो,हे पाहणे फार महत्त्वाचे...
संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या शालांत परीक्षा दरम्यान कॉपीयुक्त अभियान हाती घेण्यात आले आहे. अतिशय योग्य आहे ते. खरं तर परीक्षा ही विद्यार्थ्यांनी निकोप वातावरणात संयमाने व आत्मविश्वासाने स्वतःला अजमावून पाहण्याची असते. स्वतःचे व्यक्तिमत्त्व संतुलित कसं असावं यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.आपण वर्षभर केलेला अभ्यास आणि आपली तयारी यावर विश्वास ठेवणं हेच सध्या महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा.
परीक्षेदरम्यान ताणतणावाचं व्यवस्थापन करताना खालील काही मुद्दे समजून घ्या...
तणाव का निर्माण झाला ते जाणून घ्या. त्यापासून दूर कसं जाता येईल, याचा विचार करा.
■ आपल्या क्षमतेनुसार काम करा. आपल्या ताकदीबाहेरचे काम करू नका. त्यामुळे उगाचाच न्यूनगंड निर्माण होऊन तणाव वाढतो.
■ सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या.
■नियमित व्यायाम, योग, फिरणं, पोहणं, नृत्य यामुळे शरीर सैलावतं. तणाव कमी होतो.
■ रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणं टाळा.
● आकस्मिक घडणाऱ्या घटनांकडे शांत चित्ताने पहा व त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधा..
■ आधी आपल्याला काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा.नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा.
■ आपण सतत चिडत तर नाही ना हे पहा. मग त्यानुसार तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.आपल्या मनाला सल्ला द्या,समजवा.
■ तणावासंदर्भात तुमचे समुपदेशक, जवळचे मित्र किंवा नातेवाईक आणि पालक यांच्याशी चर्चा करा. चर्चेने तणाव हलका होतो.
■ आपली एक दिनचर्या बनवा. प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट वेळ द्या.
■ परीक्षेदरम्यान दैनंदिन आहारात बदल करू नका.
■ शाळा किंवा परीक्षा मंडळाने दिलेल्या सूचनांशिवाय इतर सूचनांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका.
■ नवनवीन व योग्य माहितीसाठी सतत शाळेतील शिक्षकांच्या संपर्कात राहा.
■ शक्यतो, काही दिवस मोबाइल व प्रसार माध्यमांपासून दूर राहा.
■ - सर्वात महत्त्वाचं, अभ्यासासाठी किंवा अभ्यासादरम्यान मोबाइलचा अतिवापर करणं इ.नकोच.
■नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा.
परीक्षा, परीक्षाकेंद्र, परीक्षेची वेळ इ. नियोजन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विचार करूनच केलेलं आहे. तणावविरहित वातावरणात परीक्षेला सामोरं जा, यश तुमचंच आहे.
पालकांनी,घ्यावयाची दक्षता
1)तुमच्या पाल्याच्या अभ्यासाचे नियोजन, आहार व त्याच्या आरोग्याची काळजी घ्या. अभ्यासाच्या बाबतीत त्याची चिडचिड होणार नाही किंवा त्याने प्रामाणिकपणे केलेल्या अभ्यास नियोजनामध्ये तुमचा हस्तक्षेप होणार नाही याबाबत दक्ष राहा.
2)तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या पाल्याला विचलित करणाऱ्या मीडियावरील बातम्यांबाबत चर्चा करणे टाळा, महत्त्वाचे, आपण नोकरी करत असाल आणि जर तुमच्या पाल्याला गरज असेल तरच रजा घ्या.
3)परीक्षा केंद्र घरापासून लांब असेल तर मात्र त्याची ने-आण करण्याची जबाबदारी नक्कीच घ्या. थोडक्यात, आपला पाल्य अभ्यासाचे यंत्र नाही याची प्रथम जाणीव ठेवून आनंदी वातावरणात त्याला परीक्षेला सामोरे जाण्यास साह्य करा.
आपला:
संतोष नन्नावार तंत्रस्नेही शिक्षक,लोकविद्यालय तळोधी(बा) ता:नागभीड जि:चंद्रपूर,शिक्षणतज्ञ जि.प.चंद्रपूर,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार 2022-23 प्राप्त, महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०१९

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...