Sunday, 8 March 2020

महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा

      महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा

       महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी जो लढा दिला त्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो.काय होता हा लढा, तर संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळपास जगभरातल्या स्त्रीयांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारला होता. त्याविरोधात महिलांनी लढा उभारला होता. त्याचवेळी जर्मनीतल्या कम्युनिस्ट कार्यकर्ती क्लारा झेटकिन प्रभावित झाली.असा एखादा दिवस असावा, ज्या दिवशी जगभरातल्या महिला आपल्या मागण्यांसाठी लढय़ाचा निर्धार व्यक्त करू शकतील अशी कल्पना मांडली. 1910 मध्ये कोपनहेगनला झालेल्या परिषदेत 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ठराव पास झाला, पण हिंदुस्थानात मुंबई येथे 8 मार्च 1943 रोजी पहिला महिला दिन साजरा झाला
        8 मार्च म्हणजे महिलांसाठी नारीशक्तीचा सण म्हणायला काही हरकत नाही. कारण आज आपण त्यांना त्यांच्या केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार केला तर त्या त्यांच्या पुढील वाटचालीस नक्कीच प्रेरणा मिळेल. आता जग बदललं तशी विचारसरणी पण बदलली ही एक अभिमानाची गोष्ट आहे की, आज आपण महिलांना संधी देतोय. प्रत्येक कुटुंबात आपली मुलगी शिकली पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे असा विचार आज प्रत्येक आईवडील करताना आपल्याला दिसतात.
      पूर्वी महिलांविषयी फक्त चूल आणि मूल असं म्हटलं जायचं. म्हणजे महिला म्हणजे फक्त घरात स्वयंपाक व घरची इतर कामे आणि मूलबाळ सांभाळायचं एवढंच तिचं काम असं मानलं जायचं. पण आज परिस्थिती बदललेली आपल्याला दिसतेय. आज महिला या चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. पूर्वी जिथं महिला चार लोकांसमोर बोलायला घाबरत होती किंवा तसं वागल्यावर कमीपणा समजला जायचा त्याच महिलेच्या हाताखाली पन्नास पन्नास लोकं काम करताना आपल्याला दिसतंय. म्हणून तर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व विविध पुरस्कार मिळताना आपण पाहतोय व ऐकतोय.
          खरंच आता जग बदललं तशी विचारसरणी पण बदलली ही एक अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण महिलांना संधी देतोय. प्रत्येक कुटुंबात आपली मुलगी शिकली पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे असा विचार आज प्रत्येक आईवडील करताना आपल्याला दिसतात. पूर्वी या गोष्टी खूप कमी पाहायला मिळायच्या. आणि समजा एखाद्या वेळेस आईवडील आपल्या मुलीला शिकवायचं आहे आणि जेव्हा ती मुलगी शिकू लागायची तेव्हा तिला व तिच्या आईवडिलांना समाजाचा इतर घटकांशी खूप सामना करावा लागायचा. कारण त्या काळात 15 ते 17 या वयोगटातच मुलीचं लग्न करून मोकळ व्हायचे आणि मनातल्या मनात एक सुटलो बाबा एकदाचा असा सुटकेचा श्वास घ्यायचे. पण आज सर्व बदलले आहे. आज महिला स्वतंत्ररीत्या जगत आहेत, त्यांचे निर्णय त्या आज स्वतः घेऊ लागल्या आहेत. म्हणून तर आज विमानाच्या पायलटपासून तर मेट्रोच्या पायलट पर्यंत त्या आपल्याला पाहायला मिळतात. जिथं महिलेला कमी समजलं जायचं किंवा हे महिलाच काम किंवा हे महिला करू शकत नाही असं समजलं जायचं तिथं आज महिला आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करताना आपण पाहतोय. त्याच महिला पूर्वी घराबाहेर निघायला घाबरायच्या त्याच महिला आज परदेशात नोकरी करून आकाशाला गवसणी घालताना आपल्याला दिसत आहेत. बाकी काहीही असो, 8 मार्च म्हणजे महिलांसाठी नारीशक्तीचा सण म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण आज आपण त्यांना त्यांच्या केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार केला तर त्या त्यांच्या पुढील वाटचालीस नक्कीच प्रेरणा मिळेल व दुसऱया महिला ज्या आज पण घराबाहेर पडायला किंवा काही काम किंवा नोकरी करायला थोडं लाजत आहेत किंवा थोडं समाजाला घाबरत असतील त्यांनासुद्धा या यशस्वी महिलांचा सत्कार व सन्मान पाहून त्यांच्या मनातसुद्धा वाटेल की या महिला करू शकतात तर आपण का नाही? इतर माहिलांसारख्या त्या पण घराबाहेर पडतील आणि त्यांना ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्या गोष्टी त्या करू लागतील. आजची स्त्री महिला राष्ट्रपती लोकोपायलट, वकील, पोलीस, न्यायाधीश, डॉक्टर, तहसीलदार, जिल्हाधिकारी, लष्करामध्ये लेप्टनंट,उत्तम शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली आहे.कुठल्याच क्षेत्रात आजची स्त्री मागे नाही.
             आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर सध्या त्या जगाचा उद्धार करणाऱ्या, दैवत असणाऱ्या, ज्या स्त्री शक्तीची नवरात्रात पूजा केली जाते, त्या स्त्रीयांची परिस्थिती कशी आहे? तीनशे पासष्ट दिवसांत एक दिवस महिला दिवस साजरा करून त्यांचा मानसन्मान केला जातो. बाकीच्या तीनशे चौसष्ट दिवसांचे काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्रीया किती सुरक्षित आहेत? रोजच वर्तमानपत्र उघडले तर त्यात महिलांचे शोषण, विनयभंग, बलात्कार, खून अशा बातम्या असतातच. अगदी पाच-सात वर्षांच्या मुलींपासून साठ-पासष्ट वर्षांच्या महिलांचा त्यात समावेश असतो. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.
           समाजात, शाळेत, नोकरीच्या ठिकाणी, नातेवाईकांत, प्रवासात एकटी स्त्री किती सुरक्षित आहे? अशातच घडलेली आंध्र प्रदेशमधील बलात्कार व त्यानंतर हत्या, विदर्भातील हिंगणघाटची घटना, संभाजीनगर, सिल्लोडची घटना आणि अशा अनेक ठिकाणी दररोज घडणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घटना काय दर्शवितात? अनेक कार्यालयांत महिला कर्मचाऱयांच्या विनयभंगासारख्या घटना घडतात, त्यांचे शोषण होते. त्या घटना दाबून टाकल्या जातात. राज्यात महिला आयोग आहे. त्याने अशा घटनांची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित असते, पण राजकीय दबावामुळे काही होत नाही. बलात्कार, स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये कारवाईस विलंब होतो. काही वर्षे निघून जातात. त्या घटनेचे गांभीर्य राहत नाही. निर्भया प्रकरणात काय झाले बघतोय आपण. आंध्र प्रदेश सरकारने कॅबिनेटमध्ये 'दिशा' कायदा मंजुरी दिली. सात दिवसांत तपास, चौदा दिवसांत न्यायालयीन कामकाज आणि एकवीस दिवसांच्या आत आरोपीस मृत्युदंड. याच धर्तीवर संपूर्ण देशात असा कायदा लागू व्हावा, त्याने अशा घटनांवर जरब बसेल.
ज्या महिलांना समाजकार्य, राजकारणाची आवड असते त्यांना मात्र संधी मिळत नाही. खऱ्या अर्थाने स्त्रीयांचा सर्वच क्षेत्रांत सहभाग कमीच आहे. जोपर्यंत महिला सक्षमपणे उभ्या राहत नाहीत; त्यांच्या निर्णय क्षमतेला मोकळेपणाने वाव मिळत नाही तोपर्यंत स्त्री मुक्त आहे हे खऱ्या अर्थाने म्हणता येणार नाही. स्त्रीविषयक अनेक कायदे आहेत, महिलांना मिळणाऱ्या सवलती आहेत, त्यांची अधिकाधिक माहिती महिलांपर्यंत पोहोचावी, स्त्री अत्याचारविरोधी कायदा कडक करून आंध्र प्रदेश धर्तीवर संपूर्ण देशात लागू होऊन अंमलबजावणी व्हावी आणि महत्त्वाचे, मुळातच स्त्रीयांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलावा. ज्या महिलांमध्ये काही कर्तृत्व आहे, त्यांना संधी प्राप्त करून द्यावी.

संतोष नन्नावार
सहा. शिक्षक तळोधी
जि:चंद्रपूर

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...